
पुणे, दि. ८ नोव्हेंबर : पार्थ पवार यांच्या कंपनीचा कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार राज्यभरात गाजत असतानाच, आता पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. शहरात सलगपणे उघड होत असलेल्या या प्रकरणांमुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोपोडी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पर्दाफाश केला आहे.
खडसे यांनी आरोप केला की, “सरकारी मालकीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा आणि त्यावर टिडीआर (TDR) मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
यापूर्वीही ‘पुणेरी आवाज’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून महसूल विभागातील भ्रष्टाचार, तलाठ्यांच्या बदल्या आणि गैरव्यवहारांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहारानंतर पुन्हा एकदा महसूल विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.