
पुणे :
‘माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते’, हे वि. वा. शिरवाडकरांचे वाक्य आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध करणारे न्यूरोस्पाईन सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ताठ कणा’ हा प्रेरणादायी चित्रपट येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर आणि ‘स्प्रिंग समर फिल्म्स’चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा गिरीश मोहिते यांनी सांभाळली आहे.
डॉ. रामाणी यांनी न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी दिशा देऊन हजारो रुग्णांना नवजीवन दिलं. लाखो रुग्णांना वेदनामुक्त करणाऱ्या त्यांच्या संशोधनाचा आणि त्यामागील जिद्द, संघर्ष व मानवतेच्या मूल्यांचा प्रवास ‘ताठ कणा’ मधून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अशोक हांडे यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
“माझ्या एका रुग्णाला माझ्यावर चित्रपट करावासा वाटणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे,” अशी भावना डॉ. रामाणी यांनी व्यक्त केली.
“डॉ. रामाणी यांच्या चिकाटीमुळे आमचं कुटुंब वेदनेतून सुखरूप बाहेर आलं. त्यांच्या संघर्षाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचं माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं,” असं निर्माते रोहन मुडशिंगीकर यांनी सांगितलं.
दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, “हा चित्रपट उत्तम टीमवर्कचा आदर्श नमुना आहे.”
अभिनेता उमेश कामत म्हणाले, “डॉ. रामाणी यांची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”
अभिनेत्री दीप्ती देवी म्हणाली, “डॉक्टरांच्या सहचारिणीची भूमिका करताना खूप काही शिकायला मिळालं.”
लेखक श्रीकांत बोजेवार यांनी सांगितलं, “डॉक्टरांचा एवढा प्रदीर्घ प्रवास मांडणं आव्हानात्मक होतं, पण त्यांच्या सहकार्यामुळे ते शक्य झालं. त्यांच्या संघर्षातून शिकण्यासारखं खूप आहे.”
या चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई आणि संजीव जोतांगिया यांच्या भूमिका आहेत.
छायांकन कृष्णकुमार सोरेन, संकलन निलेश गावंड, कलादिग्दर्शन महेश कुडाळकर, संगीत अविनाश-विश्वजीत, कार्यकारी निर्माते प्रशांत पवार आणि प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत.