महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन — ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित; ५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात

पुणे, दि. ८ नोव्हेंबर :
स्वप्नस्वरूप प्रस्तुत आणि सचिन आंबात लिखित-दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘कांतारा’ आणि ‘दशावतार’सारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘असुरवन’ हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि वारली संस्कृतीचं दर्शन घडवणारा सिनेमा आहे.

चित्रपटाच्या मोशन पोस्टरनंतर आता आलेला टीजर प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, दाट जंगल, आदिवासी परंपरेचा देखणा नजारा आणि उत्कंठा निर्माण करणारं पार्श्वसंगीत — या सर्व घटकांनी ‘असुरवन’चं रहस्य अधिक गहिरे केलं आहे.

सचिन आंबात लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे यांच्यासह अनेक कलाकार झळकणार आहेत. ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास चित्रपट टीमने व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक सचिन आंबात म्हणाले, “‘असुरवन’ हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, परंपरा आणि जंगल संस्कृतीचं दर्शन घडवणारा सिनेमा आहे. ही माती, हे जंगल, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची — हाच आमचा हेतू होता. प्रेक्षकांनी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन हा अनुभव घ्यावा.”

टीजर लिंक : https://youtu.be/V805jfzdMLM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button