
पुणे, दि. ६ नोव्हेंबर :
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणात विरोधकांनी मोठं रान उठवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांच्या बाजूने भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या, “पार्थचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. जमीन खरेदी प्रकरणाचा खुलासा राज्य सरकारनेच करावा.”
पत्रकारांनी “आपण पार्थ पवारांची पाठराखण करत आहात का?” असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या,
“पार्थ, रोहित, जय, रेवती ही आमचीच मुले आहेत. ते काही चुकीचे करतील असे मला वाटत नाही.”
दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकारकडून चौकशी व कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सुमारे ३०० कोटी रुपयांच्या किमतीची सरकारी जमीन फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर खरेदी केली. सरकारी धोरणातील एका तरतुदीचा लाभ घेत हा व्यवहार केल्याचे सांगितले जाते.
मात्र, त्याच जमिनीची बाजार किंमत तब्बल १,८०४ कोटी रुपये असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.