
पुणे दि. 6 नोव्हें : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 40 एकर जमीन खरेदीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलावर पार्थ पवार वर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. विरोधकांनी या प्रकरणात रान उठवल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.पुणे जमीन प्रकरणात अजित दादांना जेव्हा कुण कुण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवले असते तर असे झाले नसते. पण, त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात, असा खोचक टोलाच राज्याचे मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. तसेच, आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, लवकरच सर्व समोर येईल, असेही त्यांनी म्हटले.
पार्थ पवारांच्या अमेडिया या कंपनीनं ३०० कोटी रुपये किमतीची जमीन खरेदी करतांना
फक्त ५०० रुपयांची स्टँप ड्युटी भरली आहे. ती ही सरकारच्या धोरणाचा लाभ घेत. अमेडिया कंपनीनं सरकारच्या ताब्यात असलेली जमीन विकतही घेतली तेही नाममात्र ५०० रुपयांची स्टँप ड्युटी भरुन…याच जागेचा भाव एका अंदाजानुसार १ हजार ८०४ कोटी रुपये इतका आहे असा दावा केला जातोय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीचं आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
मुख्यमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता कारवाईचे संकेत दिल्यानंतर आता 2 तासांच्या आतच याप्रकरणात तहसलिदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.