पणत्यांचा लखलखाट आणि समूहगायनाने साजरा झाला ‘वंदे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

पुणे : तब्बल दीड हजार पणत्या प्रज्वलित करून साकारलेली “वंदे मातरम्” ही अक्षरे आणि पाचशे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात सादर केलेले देशभक्तिपूर्ण समूहगान — अशा प्रेरणादायी वातावरणात ‘वंदे मातरम्’ या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त १५०० पणत्या प्रज्वलित करून हा अनोखा दीपोत्सव रंगला.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. इतिहास प्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक प्रा. डॉ. न. म. जोशी, तसेच इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते.

मैदानावर “वंदे मातरम्” ही अक्षरे सजवण्यात आली होती. कविवर्य ग.दि. माडगूळकर लिखित ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गीत गात विद्यार्थ्यांनी पणत्या प्रज्वलित केल्या. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व तिरंगा ध्वज फडकविण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अजय पराड यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताचे ५०० विद्यार्थ्यांनी एकत्र सादरीकरण केले.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, “क्रांतीची ज्वाला कधीही विझत नाही. राष्ट्रप्रेमासाठी अर्पण होणारे विद्यार्थी व्हा. वंदे मातरम् हे फक्त गीत नाही, तर एक ऊर्जा आहे,” असे ते म्हणाले.

मोहन शेटे म्हणाले, “बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट केले. १९०५ मध्ये वंगभंगविरोधी आंदोलनादरम्यान या गीताने रणघोषाचे रूप धारण केले. भारतीय जनता राष्ट्राला फक्त जमीन न मानता ‘आई’ म्हणून पूजते, हेच आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे सार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

बंगालचे महाकवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना केली होती. स्वातंत्र्य संग्रामात या गीताने जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या भावनेचा गौरव करण्यासाठीच हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ज्ञानप्रबोधिनीचे श्रीरंग टोके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button