
पुणे, दि. ६ नोव्हेंबर : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणात विरोधकांनी मोठं रान उठवल्यानंतर आता राज्य सरकारकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित प्रकरणातील तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सुमारे ३०० कोटी रुपयांच्या किमतीची सरकारी जमीन फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीने खरेदी केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. कंपनीने सरकारी धोरणातील एका तरतुदीचा लाभ घेत हा व्यवहार केला असल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याच जमिनीची बाजार किंमत तब्बल १,८०४ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येतो.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ती चुकीची आहे. कुठेही अनियमितता झाल्यास कारवाई झालीच पाहिजे,” असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्र्यांनी दुपारी १२ वाजता कारवाईचे संकेत दिल्यानंतर फक्त दोन तासांतच संबंधित तहसीलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या निर्णयानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, पुढील चौकशीची उत्सुकता वाढली आहे.