
केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
पुणे, ७ ऑक्टोबर २०२५:
भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त संस्कृती प्रतिष्ठान तर्फे रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथून सुरू होणार असून, या संदर्भात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
प्रसंगी विशाल सातव, मनोज एरंडे, अमोल कविटकर, रमेश परदेशी, योगेश यावलकर, अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले,
“हा उपक्रम सर्व वयोगटातील नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरणार आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी होत असून, देशभर ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच पुण्यात ही महामॅरेथॉन होत आहे. सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही; मात्र नोंदणी अनिवार्य आहे.”
यंदाच्या ‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये २०,००० हून अधिक धावपटू सहभागी होणार असून, केनिया, इथिओपिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच देशातील नामांकित राष्ट्रीय धावपटूही सहभागी होणार आहेत. विजेत्यांसाठी एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली असून, २१ कि.मी. श्रेणीतील प्रथम क्रमांकाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंना प्रत्येकी ₹१,००,००० दिले जाणार आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी आवाहन केले की,
“पुणेकरांसह महाराष्ट्रातील नागरिकांनी या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या ध्येयाला बळ द्यावे. नोंदणीसाठी सोबत दिलेल्या QR कोडचा वापर करून सहभागी व्हा.”
🏃♂️ मॅरेथॉनमधील चार प्रमुख श्रेणी:
- २१ कि.मी. – हाफ मॅरेथॉन (टायमिंग चिपसह)
- १० कि.मी. – स्पर्धात्मक धाव (टायमिंग चिपसह)
- ५ कि.मी. – फन रन
- ३ कि.मी. – फॅमिली व बिगिनर रन