
पुणे, ७ ऑक्टोबर २०२५: मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत मराठी माझा अभिमान असोसिएशनतर्फे ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सिम्बायोसिस ऑडिटोरियम, विमाननगर, पुणे येथे होणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल, अशी माहिती असोसिएशनच्या उपाध्यक्षा अनिता लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सचिव रेखा वाबळे, खजिनदार वृषाली मिरजगांवकर, सदस्य अश्विनी देसाई, ऍड. नीलिमा चव्हाण, स्नेहा सांडभोर, अनिता नेवे आणि मुक्ता जगताप उपस्थित होत्या.
अनिता लोखंडे म्हणाल्या,
“संस्थापिका मिनल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या मंगलमय पहाटेला सुरांची मैफल सादर होत आहे. या कार्यक्रमात ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांची गायकी आणि मिलिंद कुलकर्णी यांचे निवेदन रसिकांना मंत्रमुग्ध करेल.”
रेखा वाबळे यांनी सांगितले,
“पुणे हे संगीत, नाट्य आणि साहित्याचे माहेरघर आहे. मराठी संस्कृती आणि भाषेचा प्रचार-प्रसार हा असोसिएशनचा प्रमुख उद्देश आहे.”
वृषाली मिरजगांवकर म्हणाल्या,
“संस्थेने श्रावणसरी, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, लेझीम, शंखनाद प्रशिक्षण, आषाढी वारीमध्ये शिधा वाटप आणि आपत्ती काळात मदत असे अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत.”