
उपजीविका, कला आणि शाश्वततेचा उत्सव पुण्यात सुरू
पुणे, १८ सप्टेंबर २०२५: इशान्या फाउंडेशन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यलो रिबन स्वयंसेवी संस्था मेळा (YRNF) – ग्रामीण भारत महोत्सवाचा १८ वा सोहळा पुण्यातील क्रिएटिसिटी, येरवडा येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला. या मेळ्याचे उद्घाटन स्वदेश फाउंडेशनच्या सहसंस्थापक श्रीमती झरीना स्क्रूवाला, इशान्या फाउंडेशनच्या विश्वस्त श्रीमती पारुल मेहता आणि नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती रश्मी दराड यांच्या हस्ते झाले.
हा पाच दिवसीय मेळा १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचा विषय “Explore, Embrace, Evolve” असा असून, भारतातील कारागीर, शेतकरी, विणकर, स्वयंसेवी संस्था व सामाजिक उद्योग यांच्या प्रवासाचा उत्सव यात साजरा केला जात आहे. २० हून अधिक राज्यांतील ३,००० हून अधिक अनोखी उत्पादने एका छताखाली प्रदर्शित होत असून, हा मेळा केवळ बाजारपेठ न राहता ग्राहक व समुदाय यांना जोडणारा एक सशक्त मंच ठरत आहे.
उद्घाटनावेळी झरीना स्क्रूवाला म्हणाल्या,
“यलो रिबन स्वयंसेवी संस्था मेळा हा बाजारपेठ आणि सामाजिक परिवर्तनाचा सुंदर संगम आहे. प्रत्येक खरेदी ही शेतकऱ्यांना मदत, महिलांचे सबलीकरण, कारागीरांचे अस्तित्व जपणे आणि संपूर्ण समुदायांना उन्नत करण्याचा मार्ग ठरतो. हा मेळा शहरातील ग्राहकांना ग्रामीण परिवर्तनकर्त्यांशी जोडतो आणि अधिक समावेशक भविष्य घडवतो.”