
‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅलीत हजारो पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे (प्रतिनिधी): “शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यावरण सरंक्षणासाठी सायकल चालवणे अत्यंत उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या फिट इंडिया आणि पंचसुत्रीचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुणेकरांनी असे उपक्रम राबवावेत,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली आणि ‘पुणे वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभाग घेत शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या उपक्रमात अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ७५ गरजू मुलामुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. “पुण्यातील पर्यावरण मित्रांनी (पीएम) देशाच्या प्राईम मिनिस्टरांना (पीएम) दिलेली ही अनोखी मानवंदना आहे,” असे ठाकूर यांनी सांगितले.
डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “सायकल वापरण्याची पुण्याची ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.”
रॅलीदरम्यान ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, ‘मोदी है तो, मुमकिन है’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. कार्यक्रमात सहभागी सर्वांना प्रमाणपत्र, पदक आणि टी-शर्ट देण्यात आले.