
पुणे, : रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) विचारधारा आणि सामाजिक न्यायाची चळवळ ख्रिश्चन समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमानी कांबळे, आरपीआय ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी तसेच ख्रिश्चन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जानराव म्हणाले, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आरपीआय सातत्याने संघर्ष करत आहे. या संघर्षात ख्रिश्चन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फुटावी, हा आघाडी स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ख्रिश्चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील युवक, महिला आणि विविध घटकांना नेतृत्वाची संधी मिळेल.
ते म्हणाले की, आजही ख्रिश्चन समाजातील मोठा वर्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांपासून अनभिज्ञ आहे. माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही अनेक नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ख्रिश्चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील लोकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचविणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.