
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले असून, आदरणीय अजितदादांनी दिलेला लोकाभिमुख, कर्तव्यनिष्ठ आणि संघर्षशील वारसा पुढे नेत राज्याच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.शपथविधीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसेच समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून ही जबाबदारी स्वीकारत आहे.अजितदादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच आपला खरा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि प्रामाणिक प्रशासन देण्याचा संकल्प त्यांनी केला.या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच सर्वात मोठे बळ असून, शेतकऱ्यांचे हित, युवकांसाठी संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेवटी, महाराष्ट्रातील जनता, सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.