पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; २६ जानेवारीपासून ‘रास्ता रोको’ व बेमुदत उपोषणाचा इशारा

पुणे : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेची कामे करणाऱ्या शेकडो कामगारांच्या मूलभूत हक्कांकडे संबंधित कंपनी आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. आयआरबी व आर्यन पंप यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कामगारांना सन २०२४–२५ ची कायदेशीर वेतनवाढ अद्याप देण्यात आलेली नसून, अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे व तुटपुंज्या ओव्हरटाईममुळे कामगारांचे शोषण सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या अन्यायाविरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने २६ जानेवारी २०२६ पासून पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील कूसगाव कार्यालयाजवळ पास हायवेवर ‘रास्ता रोको’ आंदोलन व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.

प्रमुख मागण्या व समस्या

वेतनवाढ: सन २०२४–२५ या कालावधीतील कायदेशीर वेतनवाढ तात्काळ लागू करावी.

ओव्हरटाईम मोबदला: नियमांनुसार पूर्ण ओव्हरटाईम वेतन न देता केवळ नाममात्र रक्कम दिली जात आहे.

वैद्यकीय व विमा संरक्षण: धोकादायक कामाचे स्वरूप लक्षात घेता सध्याची मेडिक्लेम योजना अपुरी असून, प्रत्येक कामगाराला किमान ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे.

सुरक्षा साधने: हेल्मेट, सेफ्टी शूज, जॅकेट, रेनकोट व संपूर्ण PPE किट तात्काळ उपलब्ध करून द्यावी.

प्रशासनाला स्पष्ट इशारा

या मागण्यांसंदर्भात वारंवार बैठका व लेखी निवेदने देऊनही कंपनी व प्रशासनाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. “या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तसेच सार्वजनिक गैरसोयीस संपूर्णपणे प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा बाळासाहेब भुजबळ यांनी दिला.

या आंदोलनात कामगारांसह त्यांचे कुटुंबीय — आई-वडील, पत्नी, मुले तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सचिन मेंगाळे (उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ – पुणे जिल्हा) यांनी सांगितले. मागणीपत्र मान्य होईपर्यंत लढा मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या वेळी अर्जुन चव्हाण, सागर पवार, उमेश विश्वाद, बाळासाहेब पाटील तसेच भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button