
पुणे, दि. २१ : पुणे ग्रँड चॅलेंज टूर–२०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवून त्यानंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
या स्पर्धेचा चौथा टप्पा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या मार्गावर आयोजित करण्यात आला असून, या टप्प्याचे एकूण अंतर ५८ किलोमीटर आहे. स्पर्धेदरम्यान पुणे शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल व संभाव्य कोंडी होण्याची शक्यता आहे.
शहरातील वाहतूक कोंडी टाळणे, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित आदेश पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहेत.