
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२५–२०२६ या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडून आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अधिकृतपणे युती जाहीर करत पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या महाआघाडीमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ जागा तसेच त्याअंतर्गत असलेल्या १४६ पंचायत समितीच्या जागांवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्त उमेदवार उभे करणार आहेत. या युतीची अधिकृत घोषणा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून संविधानविरोधी, जातीवादी आणि बहुजनविरोधी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट आहे. बहुजन, वंचित आणि शोषित समाजाचे मत विभाजित होऊ नये, तसेच सामाजिक न्यायाच्या विचारधारेसाठी प्रभावी पर्याय उभा राहावा, हा या महाआघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवार निवड प्रक्रिया ही तळागाळातील चर्चांवर आधारित असून, दोन्ही पक्षांच्या तालुका पातळीवरील अध्यक्षांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून संभाव्य उमेदवारांची नावे सुचवली आहेत. या याद्यांना जिल्हा पातळीवरील नेतृत्वाने अंतिम मान्यता दिली असून, नामांकन प्रक्रियेनंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पुणे जिल्हा परिषदेसाठी नियुक्त केलेले निरीक्षक प्रशांत जगताप आणि ॲड. अभय छाजेड, तसेच वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस–वंचित युतीमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.