“राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले मत म्हणजे भाजपलाच दिलेले मत” – अरविंद शिंदे

पुणे, दि. १३ : पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवत आहेत. मात्र मतांची विभागणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी आघाडी उभारली असून त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत होत आहे, असा आरोप काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला. “राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले मत म्हणजे भाजपलाच दिलेले मत आहे,” असे ठाम मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपने काही गुंडांना परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पुणेकरांमध्ये सत्ताबदलाची अपेक्षा निर्माण झाली असून त्याचे प्रतिबिंब आगामी निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) समन्वयाने प्रचार करत असून अनेक वरिष्ठ नेते सक्रियपणे प्रचारात सहभागी झाले आहेत. भाजपला स्वतःच्या कामावर विश्वास असता, तर ४३ माजी नगरसेवकांची तिकिटे कापली गेली नसती. अंतर्गत सर्वेक्षणात हे उमेदवार पराभूत होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानेच ही कारवाई करण्यात आली, असा दावाही शिंदे यांनी केला.

खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभांमध्ये जैन बोर्डिंग प्रकरणावर नागरिकांकडून थेट प्रश्न विचारले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजपने सत्तेत असताना पुण्याचा अपेक्षित विकास केला नाही. काँग्रेस काळातील योजनाच पुढे नेऊन केवळ नावे बदलण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मेट्रोची संकल्पना मांडली होती. पुण्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करता २०० किमी मेट्रोची आवश्यकता असताना आज ती केवळ ३२ किमीपर्यंत मर्यादित राहिल्याची टीकाही शिंदे यांनी केली. शहरातील विकासकामे महापालिकेमार्फत होणे अपेक्षित असताना भाजपचे नेते टेंडरमधील टक्केवारीत अडकले असल्याचा आरोप त्यांनी केला. कोथरूड भागातच १३४ कोटी रुपयांची कामे करून शहरातील इतर भागांवर निधीअभावी अन्याय झाल्याचे ते म्हणाले. स्मार्ट सिटी, २४/७ पाणीपुरवठा आणि बीआरटी योजना भाजपने गुंडाळल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे म्हणाले की, टेकड्या फोडणे आणि नदीसुधारणेच्या नावाखाली नदीपात्रात भर टाकून ते अरुंद केले जात आहे, त्यामुळे पुण्याला पूरधोका निर्माण झाला आहे. भाजप मतविभाजनासाठी इतर पक्षांतील कार्यकर्ते आणि नेते फोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुणेकर जनता सुज्ञ असून शहराच्या भविष्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधींनाच निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button