
पुणे, दि. 5: कंप्युटर, मोबाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो, असा ठाम विश्वास ‘वेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड’ (VLSI) सोसाइटीचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता यांनी व्यक्त केला.
सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या VLSI सोसाइटीच्या वतीने पुण्यात ‘39 वी VLSI डिझाइन आंतरराष्ट्रीय परिषद 2026’ आणि ‘25 वी आंतरराष्ट्रीय एम्बेडेड सिस्टीम परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत देशभरातून 2,500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले असून 550 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
परिषदेच्या उद्घाटनानंतर डॉ. सत्य गुप्ता यांच्यासह सोसाइटीचे पदाधिकारी शैलेश परब, रंजीत येवले आणि संजय घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. गुप्ता म्हणाले की, सध्या वापरात असलेल्या सर्व आधुनिक तंत्रज्ञानामागे सेमीकंडक्टर हा कणा आहे. महाराष्ट्राकडे या क्षेत्रासाठी आवश्यक असलेली कुशल मनुष्यबळ, सक्षम पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक क्षमता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकार यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सेमीकंडक्टर हब म्हणून उदयास येऊ शकतो.
केंद्र सरकारसह असम, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांनी सेमीकंडक्टरविषयक धोरणे जाहीर केली आहेत. महाराष्ट्रातही या धोरणाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
प्रमुख मुद्दे
रोजगाराच्या मोठ्या संधी: ITI प्रशिक्षित तंत्रज्ञ, डिप्लोमा व पदवीधर अभियंत्यांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध.
जागरूकतेचा अभाव: सेमीकंडक्टर डिझाइनचे प्रशिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये पुरेशी माहिती नाही.
सॉफ्टवेअरपेक्षा अधिक संधी: या क्षेत्रात सॉफ्टवेअर उद्योगापेक्षा अधिक दीर्घकालीन आणि आकर्षक करिअर संधी.
भविष्यातील उद्दिष्ट: पुढील 5 वर्षांत 50,000 प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचा VLSI सोसाइटीचा संकल्प.
शैक्षणिक संस्थांना अनुदान: विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सेमीकंडक्टर निर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांना ग्रँट दिली जाणार.
ही आंतरराष्ट्रीय परिषद 7 जानेवारीपर्यंत चालणार असून देश-विदेशातील अनेक नामवंत कंपन्या आणि तज्ज्ञ सहभागी होत आहेत.