बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ यशस्वी करण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये व ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ३० : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याची पर्यटन व क्रीडा क्षेत्रातील जागतिक ओळख अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), नेहरू युवा केंद्र, क्रीडा संघटना तसेच ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी, विविध विद्यापीठे व महाविद्यालयांचे प्रतिनिधी, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, क्रीडा संघटनांचे सदस्य तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, पुणे हे पूर्वीपासूनच सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाणारे शहर आहे. आजही सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिक नियमितपणे सायकलिंग करतात, तर सुमारे १० हजारांपेक्षा अधिक सायकलपट्टू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. पुण्याचा हा समृद्ध सायकलिंग वारसा, भौगोलिक रचना, जैवविविधता आणि ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘टूर द फ्रान्स’च्या धर्तीवर ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ चे आयोजन करण्यात येत आहे.

ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून ती युसीआय (UCI) सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जगभरात होणार आहे. चार टप्प्यांत होणारी ही स्पर्धा जिल्ह्यातील एकूण ९ तालुक्यांमधून जाणार असून, एकूण ४३७ किलोमीटर अंतराची ही शर्यत असणार आहे. तब्बल ४० देशांतील १७६ आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू या स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे या स्पर्धेबाबत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठे व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून सहभागी करून घ्यावे. तसेच ग्रामीण भागातील सरपंचांनी गावातील गणेश मंडळाचे सदस्य, NCC व NSS चे विद्यार्थी यांना स्पर्धेचे महत्त्व पटवून देत सहभागासाठी प्रेरित करावे. स्पर्धेच्या मार्गावरील गावांमध्ये पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने सायकलपट्टूंचे स्वागत करण्यात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.

बैठकीदरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या असून, त्या सूचनांवर सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button