
सोलापूर दि. 28 : आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे तृतीयपंथी इच्छुक उमेदवार अय्युब हुसेन सय्यद (वय अंदाजे …) यांची रविवारी (२८ डिसेंबर २०२५) पहाटे निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून तृतीयपंथी समाजासह राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, अय्युब सय्यद हे सोलापूरच्या लष्कर भागातील त्यांच्या निवासस्थानी झोपलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी घरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी उशीने तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आल्यावर ही घटना उघडकीस आली.
अय्युब सय्यद हे त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या अंगावर सुमारे ७५ ते १०० तोळे सोन्याचे दागिने असायचे, अशी माहिती समोर आली आहे. मात्र हत्येनंतर त्यांच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे आढळून आल्याने ही हत्या लुटीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याच्या तयारीत होते. सोशल मीडियावर ते ‘भावी नगरसेवक’ म्हणून मोठ्या प्रमाणावर परिचित होते. तृतीयपंथी समाजातील प्रश्न, मूलभूत सुविधा आणि सामाजिक सन्मान यासाठी त्यांनी अनेकदा आवाज उठवला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. काही संशयित व्यक्ती घरात शिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. संबंधित फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोलापूर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तृतीयपंथी समाजाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.