
पुणे, दि. 20 : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषद निवडणुकीदरम्यान आज, २० डिसेंबर २०२५ रोजी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धर्माबाद शहरातील बन्नाळी भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे १०० ते १५० मतदारांना कोंडून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व मतदारांनी केला आहे.
तक्रारीनुसार, भारतीय जनता पक्षच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मंगल कार्यालयात बोलावले व मतदान होईपर्यंत बाहेर जाऊ दिले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.
प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंगल कार्यालयाचे दरवाजे उघडून आत कोंडून ठेवलेल्या मतदारांची सुटका केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांवर निवडणूक आचारसंहिता भंग तसेच इतर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, धर्माबाद व मुखेड नगर परिषदेच्या एकूण २३ जागांसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान सुरू आहे. या निवडणुकीची मतमोजणी उद्या, २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.