डिकाईतर्फे भव्य दिव्यांग चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे दि19 : दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिकाई) यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली भव्य चित्रकला स्पर्धा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत विविध वयोगटांतील ६०० पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी निसर्ग, सामाजिक विषय, स्वप्ने आणि आत्मविश्वास यांचे रंगसंगतीतून व कल्पकतेतून प्रभावी चित्रण केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे आणि सर्जनशीलतेला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सायबर विभाग, मुंबई येथील पोलीस उपमहानिरीक्षक (IPS) संजय शिंत्रे, ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, डिकाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी, शाळेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, डिकाईचे सचिव शेखर यादव आणि समन्वयक प्रशांत मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कलाकार प्रमोद कांबळे यांनी एकाग्रता, सातत्यपूर्ण सराव आणि सर्जनशील दृष्टीकोन यांचे महत्त्व सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भविष्यात मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून कलेतील करिअरसाठी मार्गदर्शन देण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात बोलताना ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रंगांतून त्यांचा आत्मविश्वास, जिद्द आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने स्पष्टपणे दिसून येतात.”

डिकाईतर्फे लवकरच डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे दिव्यांग व्यक्तींना मोफत कला-कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व उच्च शिक्षणासाठी तीन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button