
नाशिक | दि. १६ डिसेंबर २०२५ — नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार आणि राज्याचे विद्यमान मंत्री माणिकराव कोकाटे यांना ३० वर्षे जुन्या ‘सदनिका घोटाळा’ प्रकरणात मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय यांनी कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय (सुनील) कोकाटे यांची दोन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.
१९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातील १० टक्के आरक्षित सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप या प्रकरणात सिद्ध झाला आहे. तपासात असे उघड झाले की, कोकाटे बंधूंनी उत्पन्न कमी दाखवून तसेच स्वतःच्या नावावर कोणतेही घर नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देत नाशिकमधील ‘निर्मल व्ह्यू’ अपार्टमेंटमधील सदनिका मिळवली होती.
या घोटाळ्याबाबत माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोकाटे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६५ व ४७१ (बनावटगिरी) अंतर्गत गुन्हे दाखल झाले. दीर्घ सुनावणीनंतर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली होती, तीच आता सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.
या निकालामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले आहे. अपात्रतेपासून वाचण्यासाठी त्यांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून, तोपर्यंत त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.