
पुणे दि. 15 : २०२५ हे वर्ष संपत असताना मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या चाहत्यांना आणखी एक मोठं सरप्राईज दिलं आहे. एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करत असतानाच, वर्षाच्या शेवटी ती थेट ओटीटीवर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
Netflix वर येणाऱ्या नव्या कोऱ्या वेब सीरिज ‘तस्करी’मध्ये अमृताची विशेष आणि लक्षवेधून घेणारी भूमिका पाहायला मिळणार आहे. या सीरिजमधून अमृता पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता Emraan Hashmi याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
‘तस्करी’ या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार असून, ही सीरिज क्राईम, थरार आणि सस्पेन्सने भरलेली असल्याचं सांगितलं जात आहे. अमृताने नुकताच ‘तस्करी’चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला असून, “तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे” ही कॅप्शन सध्या चर्चेत आहे.
इम्रान हाश्मीसोबत अमृता नेमकी कोणती भूमिका साकारणार? या तस्करीच्या विश्वात तिचा कॅरेक्टर कोणत्या वळणावर जाईल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
वर्षभर नावीन्यपूर्ण आणि दमदार प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमृता, वर्षाच्या अखेरीसही मनोरंजनाची मेजवानी देणार, यात शंका नाही. तर येत्या वर्षात रंगभूमीवर तिला पाहण्यासाठीही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.