
दि. 8 डिसेंबर 2025 :
समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणाऱ्या या महान संघर्षयोध्द्याच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
आपल्या शोक संदेशात ते म्हणाले की, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या जगण्यात आशेचा उजेड निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही ऐतिहासिक सामाजिक चळवळ उभी करून समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले.
सत्यशोधक विचारांनी प्रेरित होऊन समाजवादाची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांच्या कार्यातून दिसून येत राहिली. त्यांचा परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी शक्ती होती.
“त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील आणि सामाजिक चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून समाजसेवेचा महान तपस्वी आपण गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.