
पुणे : माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था ट्रस्ट, नसरापूर येथील ६० हून अधिक अनाथ मुलांनी पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अनुभवत पुणे दर्शनाची सफर केली. सोपान मोरे फाउंडेशनच्या वतीने आयोजित या एकदिवसीय सहलीचे नियोजन करण्यात आले होते.
सहलीची सुरुवात पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शनाने झाली. त्यानंतर मुलांनी लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतला. शनिवारवाड्याच्या भेटीद्वारे शहराचा वैभवशाली वारसा मुलांनी आत्मसात केला.
एव्हिएशन गॅलरीत विमानांचे तंत्रज्ञान व इतिहास यांची माहिती लघुपट व मॉडेल्सद्वारे मुलांना देण्यात आली. याशिवाय पुणे मेट्रोचा प्रवास करत मुलांनी आधुनिक वाहतूक सुविधेचाही अनुभव घेतला. सहलीचा समारोप पू. ल. देशपांडे उद्यान (ओकोयामा गार्डन) येथे आनंदात झाला.
या उपक्रमाविषयी बोलताना सोपान मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऋतुराज मोरे म्हणाले,
“आम्ही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवतो. काही दिवसांपूर्वी नवनाथ महाराज लिमण यांच्या संस्थेला भेट दिली होती. तेव्हाच या मुलांना पुण्याच्या वारशाची ओळख करून देण्याचे ठरवले. पुढे महाराष्ट्राबाहेरही सहल काढण्याचा मानस आहे.”
या उपक्रमासाठी नवनाथ महाराज लिमण, सौरभ कुलकर्णी, अक्षय गायकवाड, युवराज मोरे, शेखर नागापूरे, शुभम शिंदे तसेच पुणे मेट्रो कर्मचारी यांनी सहकार्य केले. गेट सेट ट्रॅव्हलचे विशेष सहकार्य लाभले.