
पुणे दि. 6 : मराठी सिनेसृष्टीतील उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये भर घालणारा सायकोलॉजिकल थ्रिलर “मॅजिक” १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा रंजक टीजर नुकताच मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक पद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवला गेलेल्या “मॅजिक” या चित्रपटात एका एन्काउंटर स्पेशलिस्ट पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या मानसिक संघर्षाची आणि उलथापालथींची कथा उलगडते. तुतरी व्हेंचर्सचे निर्माता राजू सत्यम यांनी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. रवींद्र विजया करमरकर यांनी दिग्दर्शन तर योगेश विनायक जोशी, रवींद्र करमरकर यांनी कथा लेखन केले आहे.
चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत झळकणार असून सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे आणि रसिकराज यांचा सहकलाकारांमध्ये समावेश आहे.
टीजरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये विचारमग्न अवस्थेत बसलेल्या जितेंद्र जोशींच्या चेहऱ्यावरून त्यांच्या भावनिक गोंधळाची झलक दिसते. त्याच्यापुढे अचानक एक मुलगी येते, पण ती धूसर दिसते… यामुळे कथानकाबद्दलचे रहस्य अधिकच गडद होते. पार्श्वसंगीतात घड्याळाची टिकटिक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते आणि टीजरला थरारक व अनाकलनीय वातावरण प्राप्त होते.
म्हणूनच “मॅजिक” दरवळणारं रहस्यमय मायाजाल उलगडण्यासाठी प्रेक्षकांना १ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.