
पुणे दि. 4 : रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 359 धावांचं भक्कम आव्हान उभं केलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य 49.2 षटकांत 6 विकेट्स कायम ठेवत पूर्ण केलं.
भारतासाठी ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांची शतकी खेळीही पराभव टाळू शकली नाही. त्यामुळे भारताला 350 पेक्षा जास्त धावांचा पल्ला गाठूनही इतिहासात दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा भारताला प्रथम फलंदाजी दिली. रोहित शर्मा 14 धावांवर बाद झाला, तर यशस्वी जैस्वाल 22 धावांवर माघारी परतला.
यानंतर तिसऱ्या विकेटसाठी विराट-ऋतुराजने 195 धावांची शानदार भागीदारी केली. ऋतुराजने 77 चेंडूत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले, तर विराटने 90 चेंडूत सलग दुसरे शतक नोंदवले. मात्र शतकानंतर हे दोघेही लवकर माघारी फिरले. वॉशिंग्टन सुंदर 1 धावांवर रनआऊट झाला.
भारताच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान धावांचा प्रवाह रोखता आला नाही आणि अखेरीस सामना हातातून गेला.