बंगालच्या उपसागरात नवे चक्रीवादळ! तामिळनाडू–आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे दि. 28 : देशासह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठे चढ–उतार दिसून येत आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाऊस, त्यानंतर अचानक कडाक्याची थंडी आणि आता पुन्हा एकदा उष्णतेची चाहूल लागली आहे. हवेतील प्रदूषण वाढल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.

भारताच्या सागरी किनारपट्टीवर मागील काही काळापासून सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यातून आता एक नवे चक्रीवादळ तयार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. IMD च्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होत असून यामुळे मोठा धोका संभवतो.

चक्रीवादळाचा प्रभाव लक्षात घेता अनेक राज्यांसाठी नव्याने हवामान इशारे देण्यात आले आहेत.
IMD ने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरी राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील हे वादळ येत्या काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रात न जाणे, घराबाहेर कमी पडणे, तसेच हवामान विभागाच्या पुढील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button