अनगर प्रकरण: मुलाच्या वक्तव्यावरून माजी आमदार राजन पाटीलांची अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त

पुणे, दि. 19 : अनगर नगरपरिषद निवडणुकीत उद्भवलेल्या राजकीय वादानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी सुपुत्र बाळराजे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबाची सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. उत्साहाच्या भरात झालेल्या चुकीबद्दल ते दोन्ही हात जोडून दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनगर नगरपरिषद ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पहिली बिनविरोध निवडणूक ठरली असून भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता पाटील न लढताच विजयी ठरल्या.

या विजयानंतर आयोजित जल्लोषादरम्यान बाळराजे पाटील यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत खुले आव्हान दिले. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

याबाबत प्रतिक्रिया देताना राजन पाटील म्हणाले,
“माझा मुलगा राजकीयदृष्ट्या लहान आहे. उत्साहात त्याच्याकडून अयोग्य शब्द वापरले गेले. त्या वक्तव्याचं मी समर्थन करू शकत नाही. पवारसाहेब, अजितदादा व पवार कुटुंबाची मी मनःपूर्वक माफी मागतो.”

तसेच अजित पवारांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले,
“मी आज वेगळ्या मार्गाने गेलो असलो, तरी मोठे पवारसाहेब आणि अजितदादांचं माझ्या राजकीय आयुष्यात सिंहाचं योगदान आहे. माझ्या घरातून निघालेल्या अपशब्दांबद्दल मला अतिशय खेद आहे.”

पुढे ते म्हणाले,
“माणसाचा मुलगा चुकतो तेव्हा आपण त्याला पदरात घेतो. तसंच अजितदादांनीही पार्थ आणि जयप्रमाणे माझ्या मुलाची चूक पदरात घ्यावी. हा विषय आता इथेच थांबवावा ही विनंती.”

या संपूर्ण घडामोडीनंतर अनगरची बिनविरोध निवडणूक आणखी एका राजकीय वळणावर पोहोचली असून स्थानिक राजकारणात या प्रकरणाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button