
सांगली : चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेली श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. कारणही तसंच खास — विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसं होती अलिशान गाड्या, ट्रॅक्टर आणि टू-व्हीलर!या भव्य शर्यतीत कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील बाळू दादा हजारे यांचा “हेलिकॉप्टर बैज्या” आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा “ब्रेक फेल” या बैलजोडीने मैदान गाजवत मानाची फॉर्च्युनर कार जिंकली. विजयानंतर मैदानात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला.
राज्यभरातील बैलगाडी मालक, शर्यतीचे शौकीन आणि हजारो प्रेक्षक या स्पर्धेला उपस्थित होते. सांगलीच्या तासगाव-बोरगावजवळील कोड्याचा मळा येथे या ऐतिहासिक शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानाला बैलगाडी शर्यतींच्या इतिहासातील सर्वात मोठं मैदान म्हणून ओळख मिळाली आहे.विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई मंत्रालयासमोर पार पडणार असल्याची माहिती आयोजक चंद्रहार पाटील यांनी दिली. तसेच, पुढील शर्यतीत बीएमडब्ल्यू गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
