
पुणे, दि. 9 नोव्हें : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत. विरोधकांकडून या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे.
रोहित पवार म्हणाले, “जर चूक झाली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. मात्र, ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती एखाद्या प्रकरणात अडकतो, तेव्हा त्यावर काहीच कारवाई होत नाही. पण जेव्हा भाजपला किंवा मुख्यमंत्र्यांना एखाद्या नेत्याचा ‘गेम’ करायचा असतो, तेव्हा लगेचच कारवाई केली जाते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले, पण त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. मात्र, पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली गेली. आमचं मत स्पष्ट आहे — भेदभाव न करता न्याय्य कारवाई व्हायला हवी.”
या प्रकरणात पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ (Amedia) या कंपनीवर ३०० कोटी रुपयांच्या जमिनीच्या खरेदीवेळी केवळ ५०० रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही जमीन सरकारच्या ताब्यात असल्याचं सांगितलं जातं. या जमिनीचा सध्याचा बाजारभाव तब्बल १,८०४ कोटी रुपये असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.