मुरलीधर मोहोळ पुणे जिल्हा प्रभारी — गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख

पुणे, प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाने आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी (जिल्हा प्रमुख) म्हणून, तर माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांनी बुधवारी या नियुक्त्यांची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या नेतृत्वात, तर महापालिका निवडणुकीची धुरा गणेश बिडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मोहोळ यांनी यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर म्हणून कार्य केले असून, बिडकर यांनी नगरसेवक, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेते म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

मोहोळ म्हणाले,

“केंद्रात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे, तर राज्यात मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पक्षनेतृत्वाने ही जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”

बिडकर म्हणाले,

“राज्यात भाजप आणि महायुतीला अनुकूल वातावरण आहे. २०१७-२२ या काळात पुणे महापालिकेत भाजपने सत्तेवर राहून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यंदाही पुणेकर भाजप आणि महायुतीच्याच पाठीशी राहतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल मी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आभारी आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button