
विमाननगरमध्ये पादचारी सुरक्षेचा गंभीर प्रश्न; पदपथाअभावी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
पुणे : प्रतिनिधी
‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील विमाननगर परिसरात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सलग पदपथाची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, नर्सरीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्यावरून नेण्यासाठी दोरीच्या साहाय्याने चालवावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या पादचारी सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. विमाननगरमधील कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, या मार्गावर पादचाऱ्यांसाठी सलग, सुरक्षित आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध नसल्याने नागरिकांना वाहतुकीच्या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत असल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
चिमुकल्या विद्यार्थ्यांना अधिक धोका
पदपथाअभावी सर्वसामान्य पादचाऱ्यांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही वाहतुकीच्या रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्यावरून नेण्यासाठी दोरीचा आधार घ्यावा लागणे ही चिंताजनक बाब असल्याचे टिंगरे यांनी नमूद केले.
‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ की असुरक्षित शहर?
पुण्याची ओळख ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ अशी केली जाते. मात्र, शहरातील काही भागांत लहान मुलांना सुरक्षितपणे चालण्यासाठी आवश्यक असलेला पदपथ उपलब्ध नसल्याने पादचारी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पदपथाचा अभाव ही केवळ नागरिकांची गैरसोय नसून, पादचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाब आहे. त्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनात पादचारी सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
महापालिकेने तातडीने पाहणी करण्याची मागणी
कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गाची महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करावी. तसेच सुरक्षित, सलग आणि अडथळामुक्त पदपथाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित या प्रश्नावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. पुण्याची ओळख केवळ ‘पूर्वेचे ऑक्सफोर्ड’ म्हणून नव्हे, तर सुरक्षित आणि सुयोग्य शहर म्हणूनही निर्माण झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी केली.