बेकायदा सावकारी आणि आर्थिक गैरव्यवहारांवर मोक्का अन् ‘एसआयटी’ची कारवाई; चार स्वतंत्र गुन्हे दाखल

पुणे : शहरातील बेकायदा सावकारी, आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने (SIT) सुमारे तीन महिने सखोल चौकशी केल्यानंतर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बेकायदा सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

विमानतळ पोलीस ठाणे (पहिले प्रकरण):
सोहनसिंग सरदारसिंग सोन्या (वय ४६, रा. विमाननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फत्तेसिंग गुरुचरणसिंग होरा (रा. नानापेठ), अ‍ॅड. गुरसमितसिंग गुरनामसिंग होरा, तरविंदरसिंग गुरनामसिंग होरा आणि लविंदरसिंग (तिघेही रा. विमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बेकायदा व्याजाची आकारणी करत तब्बल १५ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

विमाननगर/बाणेर परिसर (दुसरे प्रकरण):
दुसऱ्या एका कारवाईत जमीन व्यवहाराशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. हरपालसिंग सुरजितसिंग राजपाल, सिमरनबीरसिंग हरपालसिंग राजपाल, मनमितसिंग हरपालसिंग राजपाल (तिघेही रा. विमाननगर), नरिंदरसिंग मलसिंग मैनी आणि बलजितकोर सेठी (दोघेही रा. बाणेर) अशा आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या आरोपींनी २ कोटी ७५ लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सहकारनगर पोलीस ठाणे (तिसरे प्रकरण):
विजय पुनमचंद संचेती (वय ५०, रा. कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅड. गुरमीतसिंग गुरुनामसिंग होरा (रा. सहकारनगर), तरविंदरसिंग गुरुनामसिंग होरा (रा. पिसोळी) आणि गुरदीपसिंग जगतसिंग माखिजा (रा. गुरुवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात एकूण ४७ लाख रुपयांचा बेकायदा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

समर्थ पोलीस ठाणे (चौथे प्रकरण):
चौथ्या प्रकरणात भोलासिंग नाथासिंग अरोरा (वय ५८, रा. रास्ता पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समर्थ पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर बेकायदा सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष तपास पथकाकडून (SIT) या सर्व प्रकरणांचा पुढील सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button