
महापौर, पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या दीर्घकालीन अपयशाचा परिणाम : मुकुंद किर्दत
पुणे : गणेशोत्सवासह विविध मिरवणुकांमध्ये वाजवण्यात येणाऱ्या कर्णकर्कश डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाविरोधात पुणेकरांच्या भावना तीव्र झाल्या असून, रविवारी नागरिकांनी याविरोधात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनेही ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनावर टीका केली आहे.
लोकप्रतिनिधी, महापौर, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या दीर्घकालीन एकत्रित अपयशाचा परिणाम म्हणून पुणेकरांना कर्णकर्कश डीजेच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला.
गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांकडून विविध प्रकारच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांवर निर्बंध घालण्याची मागणी केली जात आहे. गणेश मंडळांसोबत झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
महापौरांनी कार्यकर्त्यांना नव्हे, नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोशल मीडियावर ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही’ अशी भूमिका मांडल्याचा दावा करत किर्दत यांनी त्यांच्यावरही टीका केली.
“ध्वनी तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही प्रथम नागरिक महापौरांची जबाबदारी आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालणे नव्हे. कर्णकर्कश, आरोग्यास घातक आणि बेकायदेशीर डीजे-डॉल्बीला बहुसंख्य पुणेकरांचा विरोध असून आम आदमी पार्टी या मागणीला पाठिंबा देते.”
ध्वनी प्रदूषणावर कायद्याची अंमलबजावणी करा
ध्वनी प्रदूषणासंदर्भात कायदेशीर मर्यादा आणि न्यायालयीन निर्देश असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा सवाल ‘आप’ने उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महापौर यांच्यावर ध्वनी प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी असताना कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही का?, असा प्रश्न पक्षाने प्रसिद्धीपत्रकातून उपस्थित केला.
ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या आवाजाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने ध्वनी प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे किर्दत यांनी सांगितले.
पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावे
सर्व जाती-धर्मांचे सण उत्साहात साजरे झाले पाहिजेत, मात्र त्यासाठी पारंपरिक वाद्ये आणि साधनांचा वापर करावा, अशी भूमिका ‘आप’ने मांडली.
पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून हजारो नागरिक मिरवणुका, सजावट, पारंपरिक वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पुण्यात येतात. मोठ्या आवाजातील डीजे-डॉल्बी किंवा अश्लील नृत्य पाहण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवणे हा गणेशोत्सवाचा उद्देश नाही, असेही मुकुंद किर्दत यांनी स्पष्ट केले.