
औषध फवारणीतील दिरंगाईवर स्थायी समितीत सुहास टिंगरे आक्रमक; आरोग्य विभागाला तातडीच्या उपाययोजनांची मागणी
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात डेंग्यू आणि हिवतापाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. औषध फवारणीतील दिरंगाई आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी केला. प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
टिंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांनी या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी औषध फवारणीचे कंत्राट संपल्याचे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण आरोग्य विभागाकडून देण्यात आले होते.
आठ वर्षांच्या मुलीचा हिवतापामुळे मृत्यू
टिंगरे यांनी सांगितले की, रविवारी त्यांच्या जवळच्या नातेवाइकाच्या आठ वर्षांच्या मुलीचा हिवतापामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
स्थायी समितीच्या बैठकीत याच विषयावर चर्चा सुरू असताना त्यांच्या प्रभागातील एका महिलेने संपर्क साधला. डेंग्यूची लागण झालेल्या तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) आठ दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर मुलगी घरी परतली; मात्र आठ दिवस उलटूनही तिच्या घरी औषध फवारणी झाली नसल्याचे संबंधित महिलेने सांगितल्याचा दावा टिंगरे यांनी केला.
सभागृहात फोनवरील संवाद ऐकवला
आरोग्य विभागाच्या कामकाजातील त्रुटी निदर्शनास आणून देण्यासाठी टिंगरे यांनी संबंधित महिलेचा फोन सभागृहातील माईकवरून सदस्यांना ऐकवला. कागदोपत्री दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये फरक असल्याचा आरोप त्यांनी केला.
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्यासमोरही त्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. डेंग्यू आणि हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित औषध फवारणी, प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना कंत्राट संपल्याचे किंवा मनुष्यबळ कमी असल्याचे कारण स्वीकारता येणार नाही, असे टिंगरे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करून डेंग्यू आणि हिवतापाचा प्रसार रोखावा. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कारणे देण्याऐवजी प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका सुहास विजय टिंगरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली.