मोकाट जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा; जखमी जनावरांसाठी २४ तास पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेची मागणी

स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांचा पुढाकार; मुख्य सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी

पुणे, दि. २६ ऑगस्ट २०२६ : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह शहरातील मोकाट व भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, चारा बँक, लसीकरण केंद्र आणि पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी मांडला होता. संबंधित विभागाचा सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या मुख्य सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

मोकाट जनावरांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याबरोबरच अपघातांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि जनावरांचे संरक्षण या दोन्ही बाबींचा समतोल साधण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे टिंगरे यांनी सांगितले.

जखमी जनावरांसाठी २४ तास तातडीची सेवा

“मृत गोमातेला उचलण्यासाठी तातडीने मदत मिळते; मात्र जखमी जनावरांच्या उपचारासाठी महानगरपालिकेची मदत वेळेत उपलब्ध होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी खंत व्यक्त करत सुहास टिंगरे यांनी जखमी आणि असहाय जनावरांसाठी २४ तास अर्जंट पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

जखमी जनावरांना घटनास्थळावरून सुरक्षितपणे पशुवैद्यकीय रुग्णालयात नेणे आणि आवश्यक उपचारांनंतर त्यांचे गोशाळेत पुनर्वसन करणे, यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गोरक्षकांच्या सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित

जनावरांच्या तस्करीविरोधात काम करताना अनेक गोरक्षकांवर हल्ले झाल्याचे नमूद करत टिंगरे यांनी प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, असे सांगितले. कायदा हातात न घेता प्रशासनाच्या माध्यमातून जनावरांचे संरक्षण आणि तस्करीविरोधी कारवाई प्रभावीपणे केली जावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मंजुरीनंतर अंमलबजावणीचे आव्हान

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता आधुनिक गोशाळा आणि २४ तास तातडीची पशुवैद्यकीय सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

“प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे; आता हा केवळ कागदोपत्री निर्णय न राहता आधुनिक गोशाळा आणि २४ तास तातडीची पशुवैद्यकीय सेवा प्रत्यक्षात सुरू करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
सुहास विजय टिंगरे, सदस्य, स्थायी समिती व नगरसेवक, पुणे महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button