विनापरवानगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला पुणे विद्यापीठ, एआयसीटीईची नोटीस; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कोणतीही परवानगी न घेता आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (डीबाटू) संलग्नित मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही (एआयसीटीई) संस्थेला नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, तर पालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डीबाटू) आणि एआयसीटीईने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस) संचालित मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयातील गैरप्रकारांबाबत आयोजित पत्रकार परिषदेत कल्पेश यादव यांनी पुराव्यांसह भूमिका मांडली. संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालय सुरुवातीला मयूर कॉलनीतील संस्थेच्या शैक्षणिक संकुलात सुरू करण्यात आले होते. प्रत्यक्षात या महाविद्यालयासाठी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची जागा प्रस्तावित असून, तेथील नव्याने बांधलेल्या इमारतीत ते सुरू होणे अपेक्षित होते.

याबाबत आम्ही पाठपुरावा केल्यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी रातोरात हे महाविद्यालय संस्थेच्या कर्वे रस्त्यावरील शैक्षणिक संकुलात हलवण्याचे ठरवले. मात्र, दोन वर्षांनंतरही अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाली नसल्याने त्यांनी ते आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या विविध इमारतींमध्ये स्थलांतरित केले.

मात्र, ही प्रक्रिया करताना त्यांनी एआयसीटीई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डीबाटूची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही. या संपूर्ण गैरप्रकाराचा आम्ही विरोध केल्यानंतर आणि संबंधित संस्थांकडे तक्रार केल्यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाने उशिराने परवानगीसाठी अर्ज दाखल केले. मात्र, या अर्जांमधील माहितीतही मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही पुणे विद्यापीठ आणि एआयसीटीईकडे याबाबत अधिकची माहिती मागितली.त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या महाविद्यालयाची परवानगी कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते, याची विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी, असे यादव यांनी सांगितले.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इमारतींसह आजूबाजूला नव्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्याचप्रमाणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इमारतींवरही मजले चढवण्यात येत आहेत. या सर्व बांधकामांसाठी पर्यावरण विभागाची, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पुणे महापालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे कागदोपत्री उघड झाले आहे. या संपूर्ण अवैध बांधकामप्रकरणी एमपीसीबीच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेने आता तरी आपल्या चुका सुधारून चालू केलेले बेकायदा वर्ग बंद करुन विद्यार्थी आणि पालकांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची दैदिप्यमान शैक्षणिक परंपरा लाभली आहे. या संस्थेतून आणि महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिकून मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. असे असतानाही आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थलांतर करणे कितपत योग्य आहे? गरवारे महाविद्यालयात शिकणाऱ्या चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कुठे जायचे? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित होत असून, त्याची उत्तरे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ देणार का, याकडे लक्ष लागल्याचे कल्पेश यादव यांनी स्पष्ट केले.


एकाच शैक्षणिक संकुलात दोन भिन्न विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये सुरू असल्यास संबंधित विद्यापीठाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २००९च्या तरतुदीनुसार विद्यापीठाने अचानक भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक संस्थेच्या दबावाखाली येऊन कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने केलेल्या गैरप्रकारांना अभय मिळत असल्याने, शैक्षणिक संस्था, डीबाटू समिती आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या दोषी अधिकाऱ्यांविरोधात कलम १७३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.”
— कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button