
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगर जैन समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे. बोरीवली पश्चिमेतील चिकूवाडी मैदान येथे आयोजित ‘संयमरंग उत्सव’ दरम्यान तब्बल 64 मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करून जैन दीक्षा स्वीकारली. अंदाजे 25 हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत हा भव्य आणि भावनिक सोहळा पार पडला.
पहाटे 4 वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी भाविकांची गर्दी उसळली होती. सकाळी सुमारे 9.30 वाजता ‘रजोहरण’ अर्पण विधी पार पडला. “जैनं जयति शासनम्” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आचार्य भगवंतांच्या सान्निध्यात विधी
दीक्षा सोहळा शांतिचंद्रसूरी समुदायाचे गच्छाधिपती आचार्य सोमसुंदरसूरीजी, आचार्य योगतिलकसूरीजी, आचार्य कुशलचंद्रसूरीजी आणि आचार्य पुण्यसुंदरसूरीजी यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाला. आचार्य भगवंतांच्या आशीर्वादाने दीक्षार्थींनी संयम जीवनातील कठोर व्रते स्वीकारली.
भावनिक क्षण
दीक्षा विधीदरम्यान अनेक कुटुंबांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता. आप्तस्वकीयांना संयम मार्गावर जाताना पाहताना अभिमानासोबतच विरहाची भावना जाणवत होती. मात्र धर्मनिष्ठा सर्वोच्च ठरली.
युवा दांपत्याचा प्रेरणादायी निर्णय
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ऋषभभाई आणि सोनलबेन या युवा दांपत्याचा संकल्प. तरुण वयात संसाराचा त्याग करून आजीवन ब्रह्मचर्य स्वीकारत त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. त्यांनी दीक्षार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. तसेच जैन समाजातील अनेक मान्यवर आणि संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
108 दीक्षांचा ऐतिहासिक टप्पा
सुमारे सात वर्षांपूर्वी याच मैदानात 44 दीक्षा पार पडल्या होत्या. आताच्या 64 दीक्षांसह एकाच स्थळी 108 दीक्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे.
पर्यावरणपूरक आयोजन
महोत्सवात पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले. भोजन व्यवस्थेत प्लास्टिक आणि डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळण्यात आला. स्वच्छतेसाठी स्वयंसेवक सतत कार्यरत होते.
पुढील कार्यक्रम
या 64 संयमींची ‘वडी दीक्षा’ श्री शांतिचंद्र शताब्दी महोत्सवांतर्गत येत्या 7 मार्च रोजी पुन्हा बोरीवली येथे आयोजित करण्यात येणार आहे.