‘मराठी अस्मिता आजार नाही!’ – मोहन भागवतांच्या विधानावर राज ठाकरेंचे कडक प्रत्युत्तर

पुणे दि. 10 : मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी “भाषेच्या आधारावर भेदभाव करणे हा एक आजार आहे” असे विधान केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाषिक अस्मितेबाबत आग्रही राहणे किंवा गरज पडल्यास त्यासाठी आंदोलन करणे हा कोणताही आजार नसून ती मराठी अस्मिता आहे. “भाषेबद्दलचा अभिमान हा आजार ठरवायचा असेल, तर देशात भाषावार प्रांतरचना का करावी लागली, याचा इतिहास आधी समजून घ्या,” असा टोला त्यांनी मोहन भागवतांना लगावला.राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या परप्रांतीय स्थलांतराचाही मुद्दा उपस्थित केला. “इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे स्थानिक भाषा, संस्कृती आणि ओळख यावर परिणाम होत असेल, तर त्याला तुम्ही आजार म्हणणार का?” असा थेट सवाल त्यांनी केला.८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे विधान केल्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले अनेक दिग्गज लोक भागवतांच्या प्रेमापोटी नव्हे, तर ‘नरेंद्र मोदी सरकारच्या भीतीपोटी’ आले होते.दरम्यान, मोहन भागवत यांनी RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा उल्लेख करत भाषिक वादाला “स्थानिक आजार” असे संबोधले होते. याच वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button