इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात! रत्नपुरी मळ्यात उभे राहणार नवी ‘एमआयडीसी

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) :इंदापूर तालुक्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीच्या इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळ्यातील तब्बल १,००० एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरीत करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.इंदापूर तालुक्यात औद्योगिक वसाहत उभी राहावी, हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. या उद्देशाने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. इंदापूरचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या प्रस्तावासाठी दिवंगत अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.या निर्णयामुळे इंदापूर, बारामती तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला मोठी गती मिळणार आहे. नव्या उद्योगांमुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, स्थानिक उद्योजकतेला चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ प्राप्त होईल.औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक निर्णायक पाऊल टाकले असून, इंदापूर लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button