
पुणे दि. 10 : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सोशल मीडिया स्टार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार निर्मला नवले यांनी इन्स्टाग्रामद्वारे आपली पहिली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.३२९ मतांनी झालेला हा पराभव अनपेक्षित आणि वेदनादायक असल्याचे मान्य करत त्यांनी कार्यकर्ते, सहकारी आणि मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत. “माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या आणि मला निवडून आणण्यासाठी झटणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची मी कायम ऋणी राहीन,” असे त्या म्हणाल्या.या पराभवापेक्षा मतदारांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि निष्ठा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा विजय असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. गेल्या दोन महिन्यांत कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा उल्लेख करत, त्या प्रत्येक प्रयत्नासाठी आपण ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या निवडणुकीत भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा पराभव केला. सोशल मीडियावर सुमारे सहा लाखांच्या आसपास फॉलोअर्स असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने या निकालाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.