
पुणे दि. 15 : पुणे पुस्तक महोत्सवच्या सांस्कृतिक पर्वात इतिहास, विचार आणि राष्ट्रभावनेचा प्रभावी संगम घडवणारे गाजलेले हिंदी नाटक ‘चाणक्य’ मंगळवारी, १६ डिसेंबर २०२५ रोजी सादर होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा विनामूल्य प्रयोग होणार असून अधिकाधिक पुणेकरांनी या वैचारिक रंगयात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
“राष्ट्रधर्म” या संकल्पनेभोवती गुंफलेले ‘चाणक्य’ नाटक प्राचीन भारतातील महान राजकारणी, तत्त्वज्ञ आणि रणनीतीकार आचार्य चाणक्य यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल वेध घेते. सत्ता, नीती, राष्ट्रहित, स्वार्थ आणि त्याग यांमधील सूक्ष्म सीमारेषा हे नाटक प्रभावीपणे उलगडते. त्यामुळे हे केवळ ऐतिहासिक कथानक न राहता आजच्या काळाशी संवाद साधणारी विचारयात्रा ठरते.
प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी या नाटकाची निर्मिती, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका साकारत चाणक्याच्या कठोर, तेजस्वी आणि दूरदृष्टीपूर्ण व्यक्तिमत्त्वाला रंगमंचावर सजीव केले आहे. नाटकाचे लेखक मिहिर भुता यांनी ऐतिहासिक संदर्भांना समकालीन आशयाची जोड देत कथानक अधिक परिणामकारक केले आहे, तर निर्माती चारू जोशी यांनी या भव्य प्रयोगाला आकार दिला आहे.
साहित्य, विचारमंथन आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संगम साधण्याच्या परंपरेत ‘चाणक्य’चा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना भक्कम वैचारिक अधिष्ठान लाभणार आहे. इतिहासातून वर्तमानाला दिशा देणारे हे नाटक पुणेकर रसिकांसाठी वेगळाच अनुभव ठरणार आहे. विनामूल्य प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे उपलब्ध आहेत.