सैनिक कल्याण विभागात ‘विधी सल्लागार’ पॅनल नेमणुकीसाठी २२ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले

पुणे, दि. १२ : सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे करार पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरूपात विधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

सैनिक कल्याण विभाग, पुणे आणि राज्यातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांच्या अधिपत्याखालील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच अवलंबितांची विविध न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. यात उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनल खंडपीठ मुंबई, औद्योगिक व कामगार न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालये या न्यायप्रणालींचा समावेश आहे.

या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी अनुभवी विधी सल्लागारांची आवश्यकता असल्याने ही नेमणूक केली जाणार आहे. यासाठी विधी सल्लागार पदावरून सेवानिवृत्त अधिकारी किंवा विधी पदव्युत्तर पदवीधारक आणि किमान १० वर्षांचा प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे-४११००१ येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३०२६०३ वर संपर्क करावा, असे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button