
स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन, सुरक्षा व आवश्यक सुविधांचा आढावा; प्रशासनाला तातडीने उपाययोजनांच्या सूचना
पुणे, ११ सप्टेंबर २०२६ :
पुणे शहराच्या वैभवशाली गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, गणेशभक्तांना सुरक्षित, सुकर आणि सुविधायुक्त विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहरातील विविध गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी पांचाळेश्वर मंदिर परिसर, गरवारे कॉलेजजवळील विसर्जन घाट तसेच लकडीपूल येथील विठ्ठल मंदिर विसर्जन घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी विसर्जन घाटांची स्वच्छता, निर्माल्य संकलन व व्यवस्थापन, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था, विद्युत रोषणाई तसेच गणेशभक्तांसाठी आवश्यक सोयी-सुविधा यांची पाहणी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पुण्याचा गणेशोत्सव ही शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असून, गणेशोत्सवाच्या काळात देश-विदेशातून भाविक पुण्यात दाखल होतात. त्यामुळे विसर्जन घाटांवरील स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
तसेच निर्माल्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन व व्यवस्थापन, घाट परिसरात पुरेशी विद्युत रोषणाई, सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतागृहांसह आवश्यक सुविधांची उपलब्धता याबाबतही संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशभक्तांचा उत्साह, श्रद्धा आणि पुण्याची गणेशोत्सवाची परंपरा यांचा सन्मान राखत स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक सुनील पांडे, शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिताताई वस्ते,
नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, प्रियांका शेंडगे शिंदे, नगरसेवक अमर आवळे, नगरसेवक पुनीत जोशी तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.