
विश्रांतवाडी–लोहगाव रस्ता रुंदीकरणासाठी दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला मिळाली मंजुरी
पुणे : विश्रांतवाडी–लोहगाव रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या धानोरीतील सुमारे १७० घरमालकांच्या मोबदल्याचा प्रश्न अखेर निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेनेही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
१७० कुटुंबांच्या हक्काचा प्रश्न
विश्रांतवाडी–लोहगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे धानोरी परिसरातील जवळपास १७० घरमालक बाधित झाले आहेत. गेल्या २० वर्षांपासून या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्याची प्रतीक्षा होती.
या बाधित कुटुंबांमध्ये अनेक माजी सैनिक असून, सांगली आणि सातारा परिसरातून येऊन धानोरीत स्थायिक झालेल्या कुटुंबांचाही समावेश आहे. त्यामुळे हा केवळ आर्थिक मोबदल्याचा विषय नसून संबंधित कुटुंबांच्या हक्काचा आणि न्यायाचा प्रश्न असल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
आता ₹६८ कोटींच्या निधीची प्रतीक्षा
महापालिकेच्या मंजुरीनंतर आता पुढील महत्त्वाचे पाऊल म्हणजे २०२६-२७ च्या महापालिका अंदाजपत्रकात सुमारे ६८ कोटी रुपयांची तरतूद करणे. ही तरतूद झाल्यानंतर बाधित घरमालकांना प्रत्यक्ष मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
केवळ आश्वासनांपुरता हा विषय न राहता निर्णयाच्या पातळीवर पुढे गेल्याने धानोरीतील बाधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्ष मोबदला मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे सुहास टिंगरे यांनी स्पष्ट केले.
“आश्वासनांपलीकडे जाऊन या प्रश्नावर निर्णय झाला आहे. आता प्रत्यक्ष मोबदला मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार. धानोरीकरांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि २० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्यासाठी माझा लढा सुरूच राहील.”
— सुहास विजय टिंगरे, सदस्य, स्थायी समिती, पुणे महानगरपालिका