
धानोरी, दि. 07 : माता जिजाऊ प्रतिष्ठान, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, युवा नेते विशाल टिंगरे आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने धानोरी येथे ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा दणदणीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सुमारे दहा हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धानोरीकरांचे अभिनंदन केले.
मोहोळ म्हणाले, “2047 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित, सुदृढ आणि बलशाली भारताचे स्वप्न आहे. पर्यावरणाचा समतोल आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धाच त्याचा एक भाग आहे. फिट इंडिया, खेलो इंडिया अशा उपक्रमांमुळे देशभरात खेळ आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढली असून, धानोरीतील ग्रीन मॅरेथॉन ही त्यातीलच एक कडी आहे.”
धानोरी जकात नाका येथून मंत्री मोहोळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेस सुरुवात झाली. १५ वर्षांवरील सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी यात सहभाग घेतला. धानोरी वन उद्यान येथे या स्पर्धेची सांगता झाली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सायकल आणि रोख बक्षिसे वितरित करण्यात आली.
कार्यक्रमास आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव, संतोषलाला खांदवे यांसह ग्रीन अवनी संस्था, वनविभाग, लोहगाव रेसिडेंटल वेलफेअर असोसिएशन, विविध प्रतिष्ठाने, मंडळे आणि धानोरी-लोहगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेनंतर धानोरी वन उद्यानात वृक्षारोपण करून उपक्रमाची सांगता झाली.