
पुणे दि. 28 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथक, पुणे यांनी टँकरमधून मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली. पथकाने सापळा रचत दोन टँकरांसह एकूण ₹1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर 2025 रोजी भोर तालुक्यातील निगडे गाव हद्दीत सातारा–पुणे महामार्गावरील हॉटेल चौधरी पॅलेस (राजस्थानी प्युअर व्हेज) मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
ही कारवाई उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त (अं.व.द.) प्रसाद सुर्वे, तसेच विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे १६ चाकी टँकर (एमएच-१२ वायबी-९१८६) आणि टँकर (एमएच-१२ युएम-९८८७) यामधून प्रत्येकी 39,800 लिटर मद्यार्क बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आढळले.
प्लास्टिक पाईपद्वारे मोठ्या प्रमाणात मद्यार्क बाहेर काढत असताना पथकाने छापा टाकला. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेले. घटनास्थळावरून 200 लिटर क्षमतेचे दोन ड्रम (एकूण 360 लि. मद्यार्क), 35 लिटर कॅन (35 लि.), 20 लिटर प्लास्टिक बादली (20 लि.), तसेच रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असा 79,600 रुपये किमतीचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच इतर ज्ञात/अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65(अ)(ई), 67, 81, 83, 90 व 103 अंतर्गत गु.र.क्र. 529/2025 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक बिराज माने, धीरज सस्ते, एन.जी. निकम, जवान सतिश पांधे, रुतिक कोळपे, शशिकांत भाट, रणजित चव्हाण, संदीप सुर्वे, माधव माडे, राहुल तारळकर, तसेच वाहनचालक शशिकांत झिंगळे आणि अमोल दळवी यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करीत आहेत.