दि पुना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटी या संस्थेच्या संचालकपदी सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांची निवड करण्यात आली.
स्वातंत्रपूर्व काळात २० जून १९२० रोजी पोलीसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलीस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. संस्थेचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, सीआयडी, एसआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वायरलेस, पोलीस प्रशिक्षण केंद्र व इतर विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कार्यालयीन कर्मचारी असे सुमारे १५,१९३ सभासद आहेत. संस्थेचे अधिकृत भागभांडवल सुमारे ३३० कोटी रुपये असून वार्षिक आर्थिक उलाढाल ३२०० कोटी रुपये आहे. संस्थेचा दरवर्षी ऑडीट वर्ग अ आहे.
संस्थेने सभासदांसाठी २० लाख रुपये अपघात विमा (सुरक्षा कवच) तसेच ३ लाख रुपयाचा कॅशलेस विमा पॉलिसी असे चांगले उपक्रम राबविले आहेत.
संस्थेच्या १३ संचालकांपैकी सेवानिवृत्तीमुळे एक संचालक पद रिक्त झाल्याने अध्यासी अधिकारी श्री.सुभाष काळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष अनिल भोंग, उपाध्यक्ष सुमित कदम, खजिनदार दिनेश गडांकुश, सचिव जमीर तांबोळी, संचालक सागर घोरपडे, आकाश फासगे, शशिकांत नरुटे, गणपत गोरे, राजेंद्र मारणे, पितांबर गंबरे, अनिल गावडे, वैशाली गोडगे, आशा राठोड यांचे उपस्थितीत घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे सभासद तसेच माझी तज्ञ संचालक महेश गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने सर्वसाधारण गटात त्यांची संचालक या पदावर बिनविरोध निवड झालेली आहे.
नवनिर्वाचित संचालक श्री.महेश गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी लोणीकाळभोर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभागात उल्लेखनीय कामगिरी केली असून आपले चांगल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. सध्या ते दहशतवाद विरोधी शाखा (ATS) येथे कार्यरत आहेत. पोलीस दलातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी माननीय पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह तसेच केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पोलीस दलातील अनुभव, प्रशासकीय कामकाजाची जाण आणि सहकारी संस्थेच्या कार्याविषयी असलेली बांधिलकी तसेच पोलीस बांधवांविषयी आत्मीयता या गुणांचा विचार करून त्यांची संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल भोंग यांनी सांगितले. या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, तसेच सभासदांच्या आर्थिक हिताचे संरक्षण, संस्थेची प्रगती आणि पारदर्शक कारभार यांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
श्री.महेश गायकवाड यांच्या निवडीबद्दल पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दि पूना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिक वाढविण्यासाठी व सभासदांच्या हकांसाठी प्रामाणिक व गतिमान प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही नवनिर्वाचित संचालक महेश गायकवाड यांनी दिली.